Sunday, April 7, 2013

एक आगळा संत! श्री रामदास स्वामी

एक आगळा संत!
महाराष्ट्राच्या उज्ज्वल संतांच्या प्रभावळीत
संत रामदासांचे वेगळेपणे फार ठसठशीतपणे समोर
येते. वाङ्मयीन, सामाजिक आणि राजकीय
या तीन अर्थानीच रामदास हे इतरांपेक्षा वेगळे
होते असे नव्हे, तर ते ज्या काळात जन्मले
आणि जी शिकवण त्यांनी दिली हे पाहिले तर
त्यांच्यातील मोठेपण समजून घेण्यास मदत
होईल. अल्लाउद्दीन खिलजीचे आपल्या प्रदेशात
येणे, विजयनगर साम्राज्याची वाताहत
आणि एकंदरच या प्रदेशावर झालेले परकीय
आक्रमण यामुळे ज्याला आज महाराष्ट्र म्हणून
ओळखले जाते तो प्रदेश मनाने मेलेल्या अवस्थेत
जवळपास चारशे वर्षे राहिलेला होता.
तेराव्या शतकाच्या सुरुवातीस यवनांचे आक्रमण
महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली.
सुरुवातीला आपल्याकडील
राजवटींनी सुरुवातीच्या काळात त्यांना तोंड दिले.
परंतु नंतर नंतर त्यांचा धीर सुटला.
विजयनगरच्या साम्राज्यातला रामदेवराय
मारला गेला आणि हा संपूर्ण टापू
परकियांच्या अमलाखाली आला.
एका दुर्दैवी योगायोगाचा भाग म्हणजे एकीकडे
आपला प्रांत असा परकियांच्या अमलाखाली येत
होता आणि त्याच वेळी संत ज्ञानेश्ववर
समाधी घेत होते. अल्लाउद्दीन
खिलजी ज्या वर्षी आपल्या प्रांतात आला त्याच
काळात संत ज्ञानेश्ववरांनी संजीवन
समाधी घेतली. त्यानंतर जवळपास चारशे वर्षे
हा प्रदेश मनाने मेलेलाच राहिला. अनन्वित
अत्याचार झाले. परंतु भागवत धर्माचा प्रभाव
इतका की त्यालाही तोंड देऊन माणसं जिवंत
राहिली, धर्म जिवंत राहिला; परंतु
काही करायची ऊर्मी मात्र हा समाज घालवून
बसला.
अशा या मनाने मेलेल्या समाजाला उभे राहावे असे
वाटले ते १६३० नंतर. म्हणजे
शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर. त्यानंतर
या प्रदेशात धुगधुगी निर्माण झाली आणि मुर्दाड
समाजाला पहिल्यांदा ‘स्व’ची जाणीव झाली.
राजकीय पातळीवर हे होत असताना सामाजिक
पातळीवर
या आणि अशा ओल्या समाजाला आकार देण्याचे
काम संतांनी केले. त्यात रामदासांचा वाटा जास्त
महत्त्वाचा. कारण त्यांनी भक्तांना मेल्यानंतर
स्वर्गात जाता यावे यासाठी पुण्य
जमा करण्याचे शिकवण्याची संतांची पारंपरिक
भूमिका सोडून इहलोकातील अस्तित्वास महत्त्व
द्यायला शिकविले. तोवर हा देह नश्वर आहे.
तो कधी तरी जाणारच.
त्याची कशाला इतकी काळजी करायची. वगैरे
प्रकारच्या शिकवणींनी मराठी मनावर शेवाळ
निर्माण झाले होते. ते रामदासांनी घालवले.
शरीरास महत्त्व आहे. तेच टिकले नाही तर पुण्य
काय करणार. असा थेट सवाल
केला आणि धडधाकट राहण्याचे महत्त्व निर्माण
केले. सर्वसाधारण जनतेस निराकार भक्ती जमत
नाही. डोके
ठेवण्यासाठी त्यांना कोणाची तरी मूर्ती हवी असते,
एखादा ज्याला देव म्हणता येईल असा आकार
हवा असतो. मारुतीच्या निमित्ताने
समर्थानी तो आकार मोठय़ा प्रमाणावर समाजात
पसरवला. त्यामुळे पूजा करायची तर
भीमरूपी महारुद्राची करायची आणि अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होण्याच्या त्याच्या क्षमतेची आराधना करायची हे
रामदासांनी तरुण, बेकाम पोरांना शिकवले.
कोणापुढे तोंड उघडायाची वेळ आली तर
आपला अभ्यास पक्का हवा,
हा त्यांचा सल्ला आहे. त्यासाठी ते सांगतात..
अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे,
प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. याचा साधा अर्थ
असा की एखाद्या विषयावर
बोलायच्या आधी अभ्यास हवा, तो नसेल तर
आपलेच हसू होईल आणि ते काही बरे नाही.
रामदासांपर्यंतच्या संतांच्या शिकविण्यात
तत्कालीन परिस्थितीमुळे असेल, पण एक
प्रकारचा निरिच्छवाद दिसतो. त्या वेळी परकीय
आक्रमक मोठय़ा प्रमाणावर अत्याचार करीत
होते. घरेदारे, पोरेबाळे लुटत होते. त्यामुळे संसार
हा एक प्रकारे असार
बनला होता आणि प्रपंचाचा एक प्रकारे
कंटाळा आला होता.
तो संतांच्या वाङ्मयातही दिसतो.
हा कंटाळा रामदासांनी घालवला. प्रपंच करण्यात
काहीही कमीपणा नाही,
तो करतानासुद्धा ईश्वरभक्ती करता येते.
किंबहुना तो चांगला झाला तरच ईश्वर
भेटतो इतक्या ठसठशीतपणे
रामदासांनी आपली शिकवण दिली. प्रपंच
करावा नेटका. असे अन्य
कोणी संतांनी सांगितल्याचे दिसणार नाही.
‘संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न
सांडता, जनामध्ये सार्थकता, विचारेची होय. दृढ
निश्चय करावा, संसार सुखाचा करावा, विश्व
जन उद्धारावा, संसर्गमात्रे’
अशी रामदासांची शिकवण. प्रपंच
नेटका करायला हवा. मग
तो नेटका करण्यासाठी काय काय अडचणी येऊ
शकतात, याची सहज शिकवण रामदास देतात.
म्हणजे तरुणपणी एखादा प्रेयसीच्या प्रेमात
कसा जगाला विसरतो, आईवडिलांकडे
कसा दुर्लक्ष करतो आणि नवसाने
झालेला हा पोरगा बायकोच्या प्रेमापोटी आपल्याशी असा वागू
लागल्यावर वृद्ध आईवडिलांना शंखतीर्थ कसे
घ्यावे लागते. हे सांगणे असो, वा ब्राह्मणे
बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर, जे
पाहताची चतुर समाधान पावती.
असा विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला असो,
रामदास रोजच्या जगण्यातील उपयुक्ततेत भर
घालतात. साहेब कामासी नाही गेला, साहेब कोण
म्हणेल त्याला. असा प्रश्न उपस्थित
करणारा व्यवस्थापन कौशल्य
जाणणारा दुसरा संत शोधूनही सापडणार नाही.
येके ठाई बैसोन राहिला, तरी मग
व्यापची बुडाला. इतक्या नि:संदिग्धपणे रामदास
सल्ला देतात तो आजच्या काळातही लागू पडतो.
हा संत इतका प्रयत्नवादी आहे की देवदेव करीत
बसा असे तो अजिबात सांगत नाही. देव
पहाया कारणे, देवळे लागती पहाणे. असे ते
सांगतात आणि पुढे लगेच म्हणतात. देवळे म्हणजे
नाना शरीरे, तेथे जीवेश्वर राहिजे, नाना शरीरे,
नाना प्रकारे भगवंत भेटे असेही लिहून टाकतात.
म्हणजे देव पाहायचा असेल, त्याला भेटायचे
असेल तर माणसांचीच सेवा करायला हवी,
अशी त्यांची मसलत आहे. राखावी बहुतांची अंतरे,
भाग्य येते तदनंतरे. असे रामदास म्हणतात
तेव्हा त्यात आधुनिक मानव व्यवस्थापन
शास्त्रच असते. नरदेहाचे उचित, काही करावे
आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त,
सर्वोत्तमी लावावे. असे ते म्हणतात
तेव्हा जन्माला येऊन काही ना काही चांगले
करण्याची गरजच अधोरेखित करीत असतात.
रामदासांनी दीर्घकालीन नियोजनास फार महत्त्व
दिले आहे. मेळवती तितके भक्षिती, ते कठीण
काळी मरोन जाती, दीर्घसूचनेने वर्ततीत,
तेचि भले. अशा शब्दात ते भविष्यासाठी नियोजन
कसे महत्त्वाचे आहे ते सांगतात. या नियोजनात
मानवी मनव्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. ते
लक्षात घेऊन रामदास सांगतात. पेरले ते उगवते,
बोलिल्यासारखे उत्तर येते, मग कटु बोलणे,
या निमित्ये. असे ते विचारतात. म्हणजे गोड
बोलून काम होत असेल तर उगाच
कडवटपणा कशाला तयार करायचा, हे ते
विचारतात, हे आधुनिक व्यवस्थापनशास्त्रच
झाले. ज्याला काही मिळवायचे आहे,
समाजासाठी काही करायचे आहे, त्याला अनेक
अडचणींना तोंड द्यावे लागते. ते
सोडवताना अनेकांची मदत घ्यावी लागते.
तशी ती जरूर घ्यावी, ज्यांना आपण तोंड देऊ
शकत नाही,
त्यांचा सामना करण्यासाठी तितक्याच
तोलामोलाचा कोणी आपल्या वतीने उभा करावा,
हे सांगताना त्यांच्यातील व्यवहारकुशलताच
दिसते. ठकासी व्हावे ठक, खटासी व्हावे खट,
लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद. असे ते
सहज सांगून जातात. हे सगळे करताना महत्त्वाचे
काय, तर मनाचा निश्चय आणि त्या अनुषंगाने
ध्येयप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न. ते जर चोख
असतील तर नशिबावर अवलंबून राहावे लागत
नाही, असे रामदासांचे म्हणणे आहे. जेणे
जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला. हे ते
सांगून जातात. म्हणजे तुम्हाला आज जे
काही मिळाले आहे ते तुम्ही काल जे काही केले
त्याचे फळ आहे. काल उत्तम असेल तर आज
आणि उद्या उत्तमच असेल,
असा त्यांचा प्रयत्नवादी सल्ला आहे. असे
करताना अभ्यास लागतो. तो डोळसपणे करावा.
कोणापुढे तोंड उघडायाची वेळ आली तर
आपला अभ्यास पक्का हवा,
हा त्यांचा सल्ला आहे. त्यासाठी ते सांगतात..
अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे,
प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. याचा साधा अर्थ
असा की एखाद्या विषयावर
बोलायच्या आधी अभ्यास हवा, तो नसेल तर
आपलेच हसू होईल आणि ते काही बरे नाही. असे
असले तरी ज्याला समाजकारण करायचे आहे,
त्याला इतरांचे सहन करायची सवय असायलाच
हवी. जो बहुतांचे सोसिना, त्यास बहुत लोक
मिळेना. अशा सोप्या शब्दांत रामदास
इतरांना मदत करण्याचे महत्त्व पटवून देतात.
हे झाले समाजकारणाच्या बाबतीत. परंतु
रोजच्या संसारातसुद्धा अनेकदा आपल्यावर
मूर्खपणा केल्याची टीका होते.
ती टाळायची असेल तर
रामदासांची मूर्खाची लक्षणे वाचायलाच हवीत.
जगात मूर्खाची लक्षणे सांगणारा दुसरा संत
मिळणार नाही. चारचौघे बैसले जन, तयामधे
करी शयन. त्यालासुद्धा मूर्ख ठरवले आहे
रामदासांनी. म्हणजे सगळे बसून गप्पा मारतायत.
त्यात एखादा गाढवासारखा लोळतोय. हे
आपणही बघत असतो. सांगे वडिलांची कीर्ति.
तो येक मूर्ख. म्हणजे उगाच बापाच्या नावाने
मिशीला तूप लावीत फिरतो आणि स्वत: मात्र
काही करीत नाही, तोही रामदासांच्या मते मूर्ख.
असोनिया व्यथ, पथ्य न करी सर्वथा. म्हणजे
एखादा आजार आहे आणि तरीही कुपथ्य
करतोय.. तोही मूर्खच. आपणास जेथे मान, तेथे
अखंड करी गमन. तोही रामदासांच्या मते मूर्ख.
परस्त्रीसी प्रेमा धरी, श्वशुरगृही वास करी.
याचीही गणना त्यांनी मूर्खातच केलेली आहे.
घरी विवेक उमजे, आणि सभेमधे लाजे, शब्द
बोलता निर्बुजे, तो येक मूर्ख. अशी उदाहरणे
आपण अनेक बघतो. घरी बडबड करतात. पण
चारचौघांत बोलायची वेळ आली की लाजतात,
हा एक मूर्खपणाच. तस्कारासी ओळखी सांगे,
देखिली वस्तु तेचि मागे. यालाही ते मूर्खच
म्हणतात आणि त्यात अयोग्य ते काय? दोघे
बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे.
याला मूर्ख नाही म्हणावे तर काय? कळह
पाहता उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे
असता खोटे साहे. तो एक मूर्ख. याचा प्रत्यय
आपल्याला आजही पदोपदी दिसेल.
दोघांची भांडणे कौतुकाने पाहणारे असंख्य
असतात. या भांडणात मध्यस्थी न
करता असा तमाशा बघत
बसलेल्यांची गणना त्यानी मूर्खात केली आहे.
अशाच पद्धतीने रामदास अनेक गोष्टी सहजपणे
शिकवतात. या सगळय़ात महत्त्व आहे ते
विवेकाला. या गुणाची आज सार्वत्रिक
कमतरता भासत असताना रामदासांची शिकवण
त्यामुळेच कालबाहय़ वाटत नाही. चांगले जगणे
शिकविणारा हा संत म्हणूनच
आजही ताजातवाना वाटतो. त्याच्याकडे
त्या नजरेने पाहायला हवे, इतकेच.
लोकप्रभातून साभार..

No comments:

Post a Comment