Saturday, January 8, 2011

छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव संबंध

दादोजी कोंडदेव ह्यांचे मुळचे नाव दादोजी कोंडदेव गोचीवडे कुलकर्णी मलठणकर होत. ह्यांना मलठणचे परंपरागत कुलकर्ण. ह्यांचा इतिहासात उल्लेख दादोजी कोंडदेव असाही येतो परंतु समकालीन पुराव्यानुसार ’ दादोजी कोंडदेउ / दादाजी कोंडदेव ‘ हेच योग्य आहे.
दादोजी कोंडदेव तसे सुरवाती पासून आदिलशाहीचे चाकर,कोंढ़ाण्याचे नामजाद सुभेदार , पण आदिलशहाने वैराण  केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा घडी बसवण्याकरिता  करीता,  दस्तूर खुद्द शाहजी महाराजानी,  दादोजी कोंडदेव यांची पुण्यावर नेमणूक केली. शाहजी महाराजांचा जो मुलुख – पुणे, इंदापूर, सुपा याचा कारभार दादाजी कोंडदेव पाहत होते.
दादोजी कोंडदेव यांचा पहिला जुना उल्लेख हा,  इ.स. १६३३ मधला मिळतो, पुणे परगण्याच्या महमदवाडी या गावा संबधीचा आहे, त्या गावचा जाऊ  पाटिल याने लिहून दिले आहे -
१)  बापूजी देऊ पाटिल घुले हा आपला भाऊ दुष्काल  पडला म्हणून गाव सोडून परमुलखास  गेला, त्यावर वडिल मेले, आम्ही वाचलो, सुकाळ जाला. “यावर दादाजी कोंडदेव दिवाण  जाले, त्यानी   मुलुख लावला ” असा उल्लेख आहे. (शिव चरित्र साहित्य खंड २, लेखांक ९५ )

२) छत्रपति शाहू महाराज (पाहिले – छत्रपती शंभूराजांचे पुत्र) यांनी शिरवळ परगण्याच्या देश कुलकर्ण विषयी  एक निवडा केला आहे, त्या परगण्याचा कुलकर्णी  यादित गंगाधर याला दिलेले १ ओक्टोबर १७२८ या तारखेचे अस्सल पत्र उपलब्ध आहे ( शिव चरित्र साहित्य खंड 1 ,ले-८२- पृ ९३-९७),
ह्यावेळी पुरावा म्हणून जी पत्रे शाहू महाराजान्समोर मांडली गेली, त्यात दादोजी कोंडदेव यांनी २ एप्रिल १६४६ ला शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठवलेले पत्र आहे, दादोजी कोंडदेव यांच्या त्या पत्रात जीजाबाई साहेबांचा उल्लेख ” सौभाग्य वती मातुश्री जीजाआऊ साहेब ” असा आहे (शिव चरित्र साहित्य खंड 1 ,ले-८२-पृ 96 ).

दादोजी पंतांच्या बाबतीत विकृत लिखाण करणाऱ्या  समाज कंटकांना आणि अविचारी जेम्स लेन सारख्या व्यक्तिना हे चोख उत्तर नहीं का ?
  • छत्रपति शिवाजी महाराज आणि  दादोजी कोंडदेव यांचा संबंध काय होता ? हे पाहूया.
काही लोक ते गुरु होते किंवा नव्हते यावर वाद घालत बसतात, महाराज त्याना काय स्थानी मानत होते हे महाराजांनाच माहिती, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला  ते कधी समजणार नहीं कारण आपली ती कुवतच नाही, पण एक मात्र निश्चित की महाराजांचे  बालपणाचे सगळे शिक्षण, हे त्यांच्याच देखरेखीखाली झाले, कुणी गुरु मानत नसेल नसो; पण महाराजाना राजकीय शिक्षणाचे धडे “दादोजी कोंडदेव” यानीच दिले, महाराजांना मार्गदर्शक म्हणुन तेच लाभले, ह्या मागची प्रेरणा मात्र “शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई साहेब” हे निःसंकोच होतेच.
  • पंत दादोजी कोंडदेव यांनी घालून दिलेल्या पद्धती सुयोग्य असल्यामुळे त्यात बदल न करणारे  शिवाजी महाराज.
दादोजीने केले असेल, ते रास्तच असेल’
पंत शिवाजी महाराजांच्या आदर स्थानी होते हे निश्चित. ह्या संबंधात किती तरी अस्सल पुरावे आहेत, ते आपण पाहूया -
१) मावळाचा सुभेदार माहादजी सामराज याने कर्यात मावळ तरफेचा हवालदार माहादाजी नरस प्रभू याला पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे.  त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी माहादाजी सामराजास पाठविलेले एक पत्र उद्धृत केले आहे. “साहेब (म्हणजे शिवाजी महाराज) कोणाला नवे करू देत नाहीत दादोजी कोंडदेव यांच्या कारकीर्दीत चालत आले असेल, ते खरे’‘, असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे.
(संदर्भ : शिवचरित्र साहित्य, खंड २ ले- ११०)
२) पुणे परगण्याच्या नीरथडी तर्फेतील परिंचे या गावच्या पाटीलकी विषयी शिवाजी महाराजांनी नीरथडी तरफेचा हवालदार तानाजी जनार्दन याला पाठवलेले २६ जून १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही  “वैकुंठवासी साहेबांचे (म्हणजे शाहजी महाराजांचे) व दादाजी पंतांचे कारकीर्दीत चालिले आहे ते करार आहे तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे”, असे म्हटले आहे.
(संदर्भ: भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, वर्ष ७, अंक १-४ (एकत्र), पृ. ४६.)
३) पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादोजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.
(संदर्भ : मराठ्यांच्या इतिहासाची साधनें, खंड १८, लेखांक १८)

४) मावळांमधील मुठे या गावच्या पाटीलकीविषयी एक नवा तंटा सुरू झाला होता. त्याविषयी शिवाजी महाराजांनी देशाधिकारी कोन्हेर रुद्र याला पाठविलेले १ नोव्हेंबर १६७८ या तारखेचे पत्र उपलब्ध आहे. या पत्रातही “दादोजी कोंडदेव यांचे वेळेस चालिले असे तेणेप्रमाणे चालवणे” असे म्हटले आहे. हे पत्र तर विशेष वाचावे. शिवचरित्राचे अनेक पैलू उघड करणारे ते पत्र आहे.
(संदर्भ : भारत इतिहास संशोधन मंडळाचे शक १८३५ चे इतिवृत्त, पृ. ४१-४२)

५) शिवचरित्र साहित्य खंड ३ मधील ३९९ व्या लेखांकात पुरंदर किल्ल्याची हकीकत आली आहे. तिच्यात शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादाजी नीलकंठराव याला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे. “दादो कोंडदेव आम्हाजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते, ते मृत्यो पावले, आता आम्ही निराश्रीत झालो’‘ असे त्यात म्हटले आहे.
६) दादोजी कोंडदेव हे शाहजी महाराजांचे सुभेदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधावयाची तजवीज केली आणि शिवाजी महाराजांच्या नावे शिवापूर पेठ वसवली अशी माहिती खेडेबार्‍याच्या देशपांड्यांच्या करिन्यात आहे.
(संदर्भ : पुरंदरे दप्‍तर, भाग ३, पृ. १३२-३३)

७) पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख हा फक्‍त सहा कलमी शकावलीत आहे. तिच्यातील शेवटचा कलमातील तो उल्लेख असा आहे :
“शके १५५७ युव नाम सवंत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा. राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.” ( शिवचरित्रप्रदीप, पृ. ७१ ) पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडात आला आहे आणि त्यात दादोजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे.
पंत दादाजी कोंडदेवांनी केलेल्या कामगिरीचे आणि शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदराचे द्योतक असे खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील आणि इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रांमधील पुरावे वर दिलेच आहेत पण ते हयात नसताना देखिल महाराज त्यांचे दाखले देऊन न्याय निवाडे करतात हे विशेष, यावरून ज्याने त्याने ठरवावे की “शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव  संबंध” हा काय होता ते.

1 comment:

  1. छान माहिती आहे धन्यवाद

    ReplyDelete