| |
श्री पांडुरंग बलकवडे यांचे
साप्ताहिक लोकप्रभा मध्ये दादोजी कोंडदेवां बद्दल
लिहून आलेली माहिती इतिहास |
|
|
|
|
पांडुरंग बलकवडे
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित अशीच आहे. |
|
|
आदिलशाहीने वैराण केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा भरभराट करण्याकरिता शाहजी महाराजांनी दादोजी कोंडदेवाची नेमणूक केलेली होती. पुणे परगणा व त्याच्या आसपासचा जो मुलूख शाहजी महाराजांकडे जहागीर म्हणून होता, त्याचा कारभार शाहजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादाजी कोंडदेव पाहात असे. दादाजी कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे. पुणे परगण्यातील महमदवाडी या गावासंबंधीचे हे पत्र आहे. त्यात त्या गावचा पाटील जाऊ पाटील याने लिहून दिले आहे की :
बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलखाला गेला. त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो. सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवाण झाले. त्यांनी मुलूख लावला. देशमुख देशकुलकर्णी यांना ताकीद केली की, ‘‘हा गाव पडला, पाटील आणऊन गाव लावणे.’’ मग आपणास नेऊन कौल (म्हणजे अभय, आश्वासन) देऊन गाव लावला.’
याच प्रकरणी, याच तारखेचा व याच आशयाचा, एक कागद गोताच्या साक्षीने करण्यात आला. त्यातही ‘‘राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार येऊन गावाची गाव लाविला’’ (म्हणजे ओसाड पडलेली गावे परत वस्ती करवून भरभराटीस आणली.) असा उल्लेख आहे.
शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई यांच्याविषयी दादाजी कोंडदेवाची काय भावना होती? छत्रपती शाहू महाराजांनी शिरवळ परगण्याच्या देशकुलकण्र्याविषयीच्या एका तंटय़ाचा निवाडा करून त्या परगण्याचा देशपांडे म्हणजेच देशकुलकर्णी, यादो गंगाधर, याला दिलेले १ ऑक्टोबर १७२८ या तारखेचे एक अस्सल वतनपत्र उपलब्ध आहे. पुरावा म्हणून जी कागदपत्रे शाहू महाराजांसमोर त्या प्रकरणी दाखल करण्यात आली त्यात दादाजी कोंडदेवाने शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठवलेले २ एप्रिल १६४६ या तारखेचे एक अस्सल पत्र होते. ते पत्र छत्रपती शाहू महाराजांनी ग्राह्य मानले आहे आणि वर नमूद केलेल्या त्यांच्या वचनपत्रात उद्धृतही केले आहे. दादाजी कोंडदेवाच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख ‘सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब’ असा आला आहे. राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजीच्या पत्रातला हा ‘मातुश्री जिजाआऊ साहेबांचा’ उल्लेख हे चोख उत्तर नाही का?
शाहजी महाराजांच्या नोकरीत सुभेदार म्हणून काम करीत असताना दादाजीला वतनांसंबंधीच्या निरनिराळ्या तंटय़ांचे निवाडे करावे लागले गोतसभेत दादाजीच्या उपस्थितीत झालेल्या अशा निदान नऊ निवाडय़ांची कागदपत्रे उपलब्ध आहेत. दादाजी कोंडदेवाने उजाड झालेला मुलूख पुन्हा लागवडीखाली आणला, अशा आशयाचा उल्लेख अनेक कागदपत्रांमध्ये व बखरींमध्ये आलेला आहे.
पुणे परगण्यातील बाणेरे (सध्याचे बाणेर) या गावी दादाजी कोंडदेवाने पिण्याच्या पाण्याकरिता पाट बांधून आणल्याचा उल्लेख एका पत्रात आला आहे. (पेशवे दप्तरातून निवडलेल कागद, खंड ३१, लेखांक ६५). पुण्यातून वाहणाऱ्या आंबील ओढय़ाला दादाजी कोंडदेवाने धरण बांधल्याचा उल्लेखही एका जुन्या कागदात आहे. (पुणे नगर संशोधन वृत, खंड १, टाचण क्र. ४८)
दादाजीच्या नि:स्पृहतेची द्योतक अशी एक हकीकत एक्याण्णव कलमी बखरीत सांगितलेली आहे. दादाजीने शिवापूर येथे शाहजीच्या नावे (शाहबाग नावाची) आंबराई लावली होती. तिच्यातील एक आंबा त्याने अनवधानाने तोडला, ही आपली चूक झाली असे वाटून तो स्वत:चा हात कापण्यास निघाला, पण लोकांनी त्याला त्या विचारापासून परावृत केले, तेव्हा त्याने स्वत:च्या अंगरख्याची एक बाही कापून लांडी केली. हा वृत्तान्त शाहजी महाराजांना समजल्यावर त्यांनी दादाजीला दिलासा देण्याकरिता मानाची वस्त्रे पाठविली आणि त्यानंतर दादाजीने लांडी बाही वापरण्याचे सोडून दिले. असा त्या हकीकतीचा आशय आहे. अशाच अर्थाची हकीकत चिटणीस बखरीत देखील सांगितलेली आहे. ही हकीकत किंवा अख्यायिका नि:स्पृहपणाबद्दल दादाजीच्या असलेल्या लौकिकाची द्योतक आहे. तसा त्या अख्यायिकेचा अन्वयार्थ करवीर संस्थानचे अधिपती छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आश्रयाने श्री. कृष्णराव अर्जून केळूसकर यांनी इ.स. १९०६ मध्ये लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात लावलेला आहे. त्या अख्यायिकेचा तसाच अन्वयार्थ ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ या ग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘मराठी सत्तेचा उदय’ या त्यांच्या ग्रंथात लावला आहे. खुद्द छत्रपती शाहू महाराज (सातारचे) यांनी ‘मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला, परंतु त्याने जे इनसाफ केले ते अवरंगजेब पादशहासही वंद्य जाहले’, असे उद्गार एका प्रसंगी काढल्याचे एका समकालीन पत्रात नमूद केलेले आहे. शाहूंचे ते उद्गार न्यायीपणाबद्दल दादाजीचा काय लौकीक होता याचे द्योतक आहेत.
दादाजीने केले असेल ते रास्तच असेल असा भरवसा खुद्द शिवाजी महाराजांनाही वाटत असे, असे अनेक समकालीन कागदपत्रांवरून दाखवून देता येते. उदाहरणार्थ : मावळचा सुभेदार महादाजी सामराज याने कऱ्यात मावळ तरफेचा हवालदार महादाजी नरस प्रभू याला पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात शिवाजी महाराजांनी महादाजी सामराजास पाठविलेले एक पत्र उद्धृत ेकेले आहे. ‘‘साहेब (म्हणजे शिवाजी महाराज) कोणाला नवे करू देत नाहीत; दादाजी कोंडदेवांच्या कारकीर्दीत चालत आले असेल ते खरे’’ असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे. पुणे परगण्याच्या नीरधडी तरफेतील परिंचे या गावच्या पाटीलकीविषयी शिवाजी महाराजांनी निरथडी तरफेचा हवालदार तानाजी जनार्दन याला पाठविलेले २६ जून १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही ‘वैकुंठवासी साहेबांचे (म्हणजे शाहजी महाराजांचे) व दादाजी पंतांचे कारकीर्दीस चालिले आहे ते करार आहे, तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे’ असे म्हटले आहे. पुणे परगण्याच्या कऱ्हेकठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंटय़ाविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र आहे. त्यात या प्रकरणी ‘‘मागे.. दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली, राजश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रणाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’’ असा ‘हुकूम राजश्री साहेबी’ (म्हणजे शिवाजी महाराजांनी) केला असल्याचे नमूद केले आहे. मावळांमधील मुठे या गावच्या पाटीलकीविषयी एक नवा तंटा सुरू झाला होता. त्याविषयी शिवाजी महाराजांनी देशाधिकारी कोन्हेर रुद्र याला पाठविलेले १ नोव्हेंबर १६७८ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही ‘दादाजी कोंडदेव यांचे वेळेस चालिले असे तेणेप्रमाणे चालवणे’ असे म्हटले आहे.
शिवचरित्रसाहित्य, खंड ३ मधील ३९९ व्या लेखांकात पुरंदर किल्ल्ल्याची हकीकत आली आहे. तिच्यात शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादाजी नीलकंठराव याला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे. ‘‘दादो कोंडदेव आम्हाजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते, ते मृत्यो पावले, आता आम्ही निराश्रीत झालो.’’ असे त्यात म्हटले आहे.
दादाजी कोंडदेव हे शाहजी महाराजांचे सुभेदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधावयाची तजवीज केली आणि शिवाजी महाराजांच्या नावे शिवापूर नावाची पेठ वसविली अशी माहिती खेडेबाऱ्याच्या देशपांडय़ांच्या करिन्यात आहे.
दादाजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी पाठविलेल्या अनेक पत्रांमध्ये ‘‘दादाजी कोंडदेव सुभेदार यांना देवाज्ञा झाली’’ असा आदरयुक्त उल्लेख आला आहे.
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फक्त सहा कलमी शकावलीत आहे. तिच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे :
‘‘शके १५५७ युव नाम संवत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा. राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तरफेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.’’
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादाजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे.
दादाजी कोंडदेवाने केलेल्या कामगिरीचे आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आदराचे द्योतक असे खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील आणि इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रांमधील पुरावे वर दिले आहेत. बखरींमधील उल्लेखही त्या पुरव्यांशी सुसंगत व त्यांना पूरक असेच आहेत. तेव्हा ते प्रमाण मानण्यास हरकत नाही.
शिवछत्रपतींची ९१ कलमी दादाजीविषयी काय म्हणते पहा-
‘‘पुणे तहद वाई, सिरवल, सुपे, इंदापूर हा प्रांत जहागीर दरोबस्त दिधली ते समई शाहजीराजे यांणी दादाजी कोंडदेव कुलकर्णी, मौजे मलठण.. लिहिणार, इमानी जाणून त्यांचे स्वाधीन मुलूख कुल येखतीयारी देऊन ठेविले..दादाजी कोंडदेव त्यांचे स्वाधीन मुलूख केला ते समई (शाहजी राजांनी त्यांना) सांगितले जे चिरंजीव (शिवाजी महाराज) व स्त्री (जीजाबाई) जुनरी आहेत त्यांच आपल्यापासी आणून महाल बांधोन उभयेतास अन्नवस्त्रे देऊन चिरंजीवास (म्हणजे शिवाजी महाराजांना) शाहणे करणे. हे आज्ञा करोन शाहजी राजे विज्यापुरास गेले. दादाजीपंती सिवनेरीहून जिजाऊसव सिऊबास आणून पुढे लाल महाल बांधोन उभयेतास बरे इजतीने ठेविले.. सिऊबास शाहणे केले.’’
त्याच बखरीत ‘‘दादाजीपंताचा मृत्यू झाला ते समई सोळा-सतरा वर्षांंचे शिवाजीराजे होते, त्यांणी बहुत शोक दादाजीपंत क्रमले (म्हणजे मृत्यू पावले) ते समई केला’’ असेही सांगितले आहे.
श्रीमंत महाराज भोसले त्यांची बखर, म्हणजेच शेडगावकर भोसले बखर, या बखरीतही शाहजी राजांची जहागीर भरभराटीस आणण्याकरिता दादाजीने केलेल्या व्यवस्थेचे तपशीलवार वर्णन केले आहे. आणि शेवटी ‘‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यांस तयार केले’’ असे म्हटले आहे.
शिवादिग्विजय बखरीतदेखील ‘‘शिवाजी महाराज पुणे प्रांती राहून दादाजीपंती विद्याभ्यास करविला; मल्लयुद्ध, शस्त्रयुद्ध करावयाच्या गती शिकविल्या’’ असे म्हटले आहे.
येथवर दादाजीपंताच्या कामगिरीविषयीचे पुरावे काय आहेत ते संक्षेपाने सांगितले. आता या व इतर पुराव्यांवरून नामवंत इतिहासकारांनी काय निष्कर्ष काढले आहेत ते थोडक्यात सांगतो.
करवीर संस्थानचे अधिवती श्री छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आश्रयाने श्री. कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र १९०६ मध्ये प्रकाशित झाले. त्यात दादाजीच्या इमानी व स्वामिकार्यदक्ष प्रवृत्तीचे आणि शाहजी महाराजांची जहागीर भरभराटीस आणण्याकरिता त्याने केलेल्या कार्याचे विस्तृत वर्णन केले आहे आणि ‘‘अशा या प्रामाणिक, धर्मशील व पापभीरू पुरुषाच्या स्वाधीन आपल्या पुत्रास करण्यास शहाजीराजांस काहीएक दिक्कत वाटली नाही, हे साहजिक आहे आणि दादाजीनेही आपल्या धन्याच्या ह्या गुणी व हुशार मुलाचे संगोपन मोठय़ा प्रेमाने व दक्षतेने केले’’ असे म्हटले आहे. श्री. केळूसकर यांनीच पुढे असेही सांगितले आहे की ‘‘सारांश जमाबंदीची व्यवस्था नीट लावून प्रजा आबाद कशी राखावी, शेतकऱ्यांस उत्तेजन देऊन उत्पन्न कसे वाढवावे, घोडे वगैरे जनावरांची जोपासना कशी करावी, शिपाई-प्यादे वगैरे नोकर पदरी ठेवावयाचे ते कसे पारखून ठेवावे, नोकरांस राजी राखून त्यांच्याकडून इष्ट कामे कशी बिनबोभाट करवून घ्यावी, पागा व लष्कर यांची शिस्त कशी राखावी, इत्यादी गोष्टींचे ज्ञान महाराजांस दादाजीकडून अल्प वयातच चांगले प्राप्त झाले. ह्या अनुभवाचा व ज्ञानाचा परिपाक पुढे किती उत्तम प्रकारे झाला व त्यापासून कोणती कार्ये उद्भवली ते सर्व जगास विदित आहे.’’
‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ या ग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘मराठी सत्तेचा उदय’ या त्यांच्या ग्रंथात दादाजी कोंडदेवाच्या कार्याचे मूल्यमापन अशाच प्रकारे केले आहे. ते म्हणतात ‘‘दैनंदिन राज्यकारभारातील दादोजीची उदाहरणे संस्कारक्षम महाराजांच्या मनावर परिणाम करून गेल्याशिवाय राहिली नाहीत,’’ ‘‘अशी नीतिमत्ता असणारा शिक्षक महाराजांना मिळाल्यामुळेच पुढे त्यांच्या कारभारातही हा आदर्श दिसून येतो,’’ ‘‘शिवाजी महाराजांना सदरेवर बसवून त्यांच्यासमोरच तंटय़ांची सुनावणी व निकाल दिला जात असे, असे करत असता, महाराजांना न्यायदानाचे प्रशिक्षण मिळावे हाच त्याचा (म्हणजे दादोजी कोंडदेवाचा) हेतू होता, ’’ ‘‘सारांश, जिजाईसारखी माता व दादोजी कोंडदेवासारखा पालक महाराजांना लाभल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान, स्वधर्मनिष्ठा, नीतिधैर्य, धाडस, शौर्य, राज्यकारभारकौशल्य, मुत्सद्देगिरी इत्यादी राज्यकर्त्यांस आवश्यक असणारे गुण निर्माण झाले व त्यांची पुढे वाढ होऊन महाराष्ट्राला हा थोर राजा लाभला.’’
डॉ. जयसिंगराव पवार यांच्याच ‘शिवाजी आणि शिवकाल’ या ग्रंथातही वरील आशयाचीच मते त्यांनी व्यक्त केली आहेत.
प्रा. रा. ज्ञा. गायकवाड (प्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा), प्रा. बा. शं. सूर्यवंशी (इतिहास विभाग प्रमुख, न्यू कॉलेज, कोल्हापूर) आणि प्रा. विलास पाटील (छ. शिवाजी कॉलेज, सातारा) या तिघांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज व शिवयुग’ या ग्रंथातही दादाजी कोंडदेवाच्या कामगिरीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्यात ते म्हणतात ‘‘दादाजी कोंडदेव याचा शिवाजीचा गुरू म्हणून उल्लेख केला तर यात काहीच अवास्तव नाही, कारण याने शिवाजीला राज्यकारभार, न्यायदान इ. क्षेत्रातील शिक्षण दिले, ’’ ‘‘जहागिरीचा कारभार दादोजी पाहत असताना शिवाजी त्याच्या सान्निध्यात नेहमी असे, त्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण शिवाजीला मिळत होते,’’ ‘‘शिवाजी पुढे जो उत्तम प्रशासक, मुत्सद्दी राजकारणी, न्यायनिष्ठुर न्यायाधीश, कुशल सेनापती झालेला दिसतो हे दादोजी कोंडदेवाच्या प्रयत्नाचे व शिक्षणाचेच फळ होते.’’
इ.स. १६४४ मध्ये शाहजी राजांवर आदिलशाहाची इतराजी झाली आणि शाहजी राजे आदिलशाही दरबार सोडून गेले. तेव्हाही दादाजी कोंडदेवाने शाहजी राजांची साथ सोडली नाही. ‘शाहजी भोसले दरबारातून निर्वासित झाला आहे आणि म्हणून त्याचा मुतालिक (म्हणजे प्रतिनिधी) दादाजी कोंडदेव याचे पारिपत्य करण्याकरिता कोंढाण्याकडे स्वारी पाठविली आहे’ अशा अर्थाचे मुहम्मद आदिलशाहाने पाठविलेले १ ऑगस्ट १६४४ या तारखेचे एक अस्सल फर्मान कारीच्या जेधे देशमुखांकडे मिळाले आहे. (ऐतिहासिक फारसी साहित्य, खंड १, लेखांक ४८ किंवा इंडियन हिस्टॉरिकल क्वार्टर्ली, खंड ७, अंक २)
शिवाजी महाराजांचे वय तेव्हा लहान असल्यामुळेच त्यांचा त्या फर्मानात उल्लेख नाही. पुढे ते प्रकरण मिटले. शाहजी राजे पुन्हा आदिलशाही दरबारात परतले आणि दादाजी कोंडदेव इ. स. १६४७ मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत शाहजी महाराजांचा सुभेदार म्हणून त्यांच्या पुण्याच्या परिसरातील जहागिरीचा कारभार करीत राहिला.
कठीण प्रसंगातही दादाजी कोंडदेवाने शाहजी राजांची साथ सोडली नाही, हे ह्या संपूर्ण प्रकरणावरून दिसून येते.
सारांश, खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील उल्लेख, इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रे आणि बखरी या सर्व प्रकारच्या साधनांमधून दादाजी कोंडदेवाच्या कामगिरीचे एक सुसंगत चित्र आपल्यापुढे उभे राहते. दादाजी कोंडदेव हा शाहजी महाराजांचा विश्वासू सेवक होता, मातोश्री जिजाबाई व बाल शिवाजी यांची पुणे येथील जहागिरीत व्यवस्था ठेवण्याची आणि बाल शिवाजीला शिक्षण देण्याची कामगिरी शाहजी महाराजांनी त्याच्यावर सोपविली होती, त्याने ती उत्तम प्रकारे पार पाडली आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या मनात त्याच्याविषयी आदरभाव होता, असे त्या चित्राचे स्वरूप आहे. या जुन्या पुराव्यांच्या आधारे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे इतिहासकार श्री. कृष्णराव केळूसकर यांच्यापासून ते सध्याचे नामवंत इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेक विद्वान इतिहासकारांनी दादाजीच्या कार्याचे जे वर्णन केले आहे त्याची रूपरेषाही वरीलप्रमाणेच आहे. पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याची नोंद ज्या एकमेव सहा कलमी शकावलीत आहे त्या नोंदीत देखील दादाजीचा स्पष्ट उल्लेख आहे.
म्हणून, पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित अशीच आहे. त्या शिल्पबद्ध स्मारकाची किंवा त्यातील कोणत्याही अंशाची तोडफोड करणे ही गोष्ट त्या स्मारकाचा आणि पर्यायाने खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी ठरेल अशी माझी भावना आहे.
(संदर्भ ग्रंथ : शिवचरित्रसाहित्य, मराठय़ांच्या इतिहासाची साधने, ऐतिहासिक संकीर्ण साहित्य, एक्याण्णव कलमी बखर, चिटणीस बखर, छत्रपती श्री शिवाजी महाराज चरित्र, मराठी सत्तेचा उदय, पेशवे दप्तर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे इतिवृत्त व त्रमासिक, शिवचरित्रप्रदीप, मराठी दप्तर, श्रीमंत महाराज भोसले यांची बखर, शिवादिग्विजय, छत्रपती शिवाजी महाराज व शिवयुग)
lokprabha@expressindia.com |
|
|
namaskar ...... kahi lokani chtrapati chi badnami karaycha thekach ghetla ahe.kahi jan mhantat shivrayani rajybhisheka veli ek shudra stree shi lagin kele tyala kahi purava nahi pan mahavir snglikar ha jain ani ramteke ha baudha yani aplya blog var tase lihile ahe.ramteke ne tar saral saral ramayanch ghadle navte ase lihile ahe. aaj aply dharmatil lokani kay bangdya bharly ahet ka?
ReplyDelete