Friday, January 20, 2012

बाजी

राजे.....जा गडावर..
जा गडावर....जा गडावर
बाजी तुमचा खपला येथे
गर्दन नाही आज धडावर
... आज धडावर.आज धडावर.....

रोमरोमात घुसल्या तलवारी,
छातीवरच्या जखमा जरतारी..
भोसकलेल्या मनास खंत,
कधी पोहोचेल राजा घरी.....

राजे..आवाज द्या आवाज द्या,
राजे जा गडावर जा गडावर...
लढतो आहे सेनानी तुमचा,
आडवा होऊन घोडखिंडीवर.....

पावला हा देशपांडा,
पाजळलेला हाती दांडा....
नाहीच सोडला एकही लांडा
तोडुनी काफ़िरांच्या कुभांडा......

राजे.. जा त्वरीने जा गडावर,
तीन तडाखे द्या कानावर....
गद्दारांना लोळवताना,
बाजी लढला प्राणपणावर...

आज रणात बाजी लढला
थोपवुन शत्रुस उभा नडला.....
एक एक ठेचुन बांडगुळ,
बघा रणावरी ढिग पडला.....

जिजामातेस वंदन सांगा,
कशा लावल्या खिंडीत रांगा.....
पकडुन सारे फ़ुटीर आपले,
आईसमोर वेशीस टांगा...

आज कामी प्राण आला,
राजा माझा सुखिया झाला......
मराठ्यांचा पोशिंदा सिंह,
पुन्हा गडावर निघता झाला.....

राजे...आवाज....आवाज..
तोफ़ांचे आवाज कानी आहेत....
खिंखळणारी मायाळु अश्वे,
जवळी माझ्या रणी आहेत...

राजे.....माफ़ करा माफ़ करा,
बाजी नसेल लढाईत पुढच्या.....
अविरत इच्छा असुनसुद्धा,
प्राण हिरावले युद्धात आजच्या....

राजे....शिवराजे.....शिवबा...
हात जोडुनी पुन्हा वंदितो....
बिनमस्तकाने तुम्हा चिंतितो....
स्मरुण मराठी माय माझी,
ज्योत माझी आता विझवितो...राजे....राजे....
 

No comments:

Post a Comment